MLA Shankar Mandekar : भोर-राजगड-मुळशीसाठी आमदार मांडेकर मैदानात; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे भरीव निधीची मागणी
MLA Shankar Mandekar : मुळशी आणि भोरमधील जल जीवन मिशनच्या कामांचा दर्जा निकृष्ट; श्वेतपत्रिका जाहीर करून चौकशी करण्याची आमदार शंकर मांडेकर यांची मागणी.

MLA Shankar Mandekar – जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा, रस्ते, पाटबंधारे, महावितरण, आरोग्य, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थेसाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली.
ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या बैठकीत आमदार मांडेकर यांनी जल जीवन मिशन अंतर्गत भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने भविष्यात ग्रामस्थांची डोकेदुखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वारंवार सूचना करूनही संबंधित अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या कामांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, चौकशी करावी आणि उर्वरित कामांसाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठीही त्यांनी बैठकीत पाठपुरावा केला. मुळशी तालुक्यातील वडवाधर-नांदवली-शेडणी येथील श्री वाघजाई देवी देवस्थान, राजगड तालुक्यातील धानेप येथील ध्यान्येश्वर देवस्थान,
तसेच भोर तालुक्यातील मोहरी बु. येथील अमृतेश्वर मंदिर आणि भोर शहरातील भोरेश्वर देवस्थान या चार देवस्थानांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. प्रवाही सिंचनासाठी वैयक्तिक लाभधारकांवर वाढवण्यात आलेल्या ठोक जलशुल्काबाबत शेतकर्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगत, विशेषतः ऊस पिकासाठी गळीत हंगाम 2026-27 मध्ये कपातीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.
भोर-राजगड-मुळशी हे डोंगरी आणि दुर्गम भाग असल्याने अनेक वाड्या-वस्त्यांवर अद्याप वीजपुरवठा पोहोचलेला नाही. शिवाय अनेक ठिकाणी विद्युत खांब गंजलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे महावितरणला डीपीसीसीमार्फत वाढीव निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित होत असल्याचे निदर्शनास आणून देत 108 रुग्णवाहिका सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दाही मांडेकर यांनी मांडला.
भोर आणि राजगड तालुक्यात स्वतंत्र क्रीडा संकुल नसल्याने नवीन क्रीडा संकुलांसाठी निधी मंजूर करावा, तसेच मुळशी येथील क्रीडा संकुलासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वाळेण (ता. मुळशी) आणि कोदवडी (ता. राजगड) येथील पुलांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करावी,
तसेच भोर आणि राजगड तालुक्यातील उपसा जलसिंचन योजना व कालव्यांच्या कामांसाठी निधी द्यावा, अशीही मागणी आमदार मांडेकर यांनी केली. हिंजवडी, मारुंजी, घोटवडे, भुगाव, सुस गाव आणि सनी वर्ल्ड खिंड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच सुस-सनी वर्ल्ड रस्त्यांसाठी वन विभागाची परवानगी तातडीने द्यावी, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.






