Shankar Mandekar: मुळशीत पाणीटंचाईच्या उपाययोजनांना प्राधान्य द्या! आमदार शंकर मांडेकरांच्या प्रशासनाला सूचना
Shankar Mandekar: धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवण्याचे आव्हान; विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना.

Shankar Mandekar- राज्यात पावसाने अचानक माघार घेतल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळशी तालुक्यात तुलनेने काही प्रमाणात पाऊस झाला असला, तरी गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भातशेती अडचणीत आली आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरण्याचे आव्हान असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे आणि संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात,
अशा सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी दिल्या. मुळशी तहसील कार्यालयात प्रशासनातील विविध विभागांच्या प्रमुखांची नियोजन बैठक झाली. यावेळी तहसीलदार विजयकुमार चोबे, सभापती मंदा शेळके, उपसभापती दगडू करंजावणे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, मिलिंद वाळंज, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे, काजल मोरे, नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी, महावितरणचे उपअभियंता घुले आदी उपस्थित होते.
दरम्यान, शेतीपंपांचे साहित्य आणि रोहित्रांची चोरी वाढत असल्याच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. चोरीचे साहित्य भंगार विक्रेत्यांकडे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी सूचना आमदार मांडेकर यांनी केली. दुष्काळ निवारणाची कामे निधीअभावी थांबवू नयेत. शासनाच्या निकषांत निधी बसत नसल्यास जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करून घ्यावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतीपंपांची वीजजोडणी तोडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार मांडेकर यांच्या प्रमुख सूचना
तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मुळशी प्राधिकरणाच्या नादुरुस्त पाइपलाइनची दुरुस्ती, मावळमधून पर्यायी वीजपुरवठा घेण्याचे काम पूर्ण करणे आणि माले उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करावी. विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्याबाबतची प्रक्रियाही सुरू करावी, अशी सूचना तहसीलदार चोबे यांनी मांडली.





