Walhe News: ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण! राख गावात विहिरी आटल्या, नागरिक टँकरच्या आश्रयाला
Walhe News: पुरंदर तालुक्यात अतिअल्प पावसामुळे जलस्रोत आटले; ऐन पावसाळ्यात राख (ता. पुरंदर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई.

Walhe News – ऐन पावसाळ्यात राख (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील लोकांची तहान टॅंकरने भागवली जात आहे. जलजीवन मिशनची अर्धवट अवस्थेत असलेल्या कामामुळे येथील नागरिकांची तहान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या टॅंकरच्या माध्यमातून भागवली जात आहे.
पुरंदर तालुक्यात यावर्षी अतिअल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात नैसर्गिक जलस्त्रोत लवकरच आटून गेल्याने जमिनीतील पाणीपातळीत लवकरच खालावली आहे. राख ग्रामपंचायत हद्दीतील गोरे खंडाळे वस्ती येथे टॅंकर सुरू केला असून, पडळकर वस्ती,करेवस्ती, आलगुजदरा, कापडदरा आदी वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यावाचून मोठी हेळसांड होत असल्याने दरवर्षी प्रमाणाचे येथील ग्रामस्थांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातील वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन ते तीन वर्षांपासून केंद्रशासनाने ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी या योजना पूर्णत्वास गेल्या नसल्याने तसेच मागील दोन-तीन वर्षाचा अल्प पाऊस आटलेले पाणवठे व ऐन पावसाळ्यापासूनच दुष्काळी परिस्थितीने दिलेला तडाखा;
यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक भागांतील वाड्या-वस्त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. अनेक गावांत जलजीवन मिशनची कामे रडतखडत सुरू आहे. ही कामे त्वरित पूर्ण होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ऐन पावसाळ्याच्या काळात पाऊस पडत नसून दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. शासन या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही.
जलजीवनची कामे रखडली
पुरंदर तालुक्यामध्ये अनेक गावांतील जलजीवन मिशनची कामेअर्धवट अवस्थेच आहेत. दरम्यान, ‘हर घर जल’ जलजीवन मिशन अंतर्गत राख गावासाठी १२ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, भरीव निधी देऊनही अद्यापपर्यंत येथील काम पूर्णत्वास गेले नसल्याने गावातील वाड्या-वस्त्यांवरील जनतेची तहान श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या टॅंकरच्या माध्यमातून भागवली जात आहे.






