Traffic Jam : महसूल ‘नंबर वन’; मात्र सुविधा ‘शून्य’! महाळुंगे इंगळे परिसरात वाहतूक कोंडीचा विळखा
Traffic Jam : सर्वाधिक महसूल देऊनही महाळुंगे इंगळे मूलभूत सुविधांपासून वंचित; वाहतूक कोंडीमुळे कामगारांचे कामाचे तास वाया.

Traffic Jam – पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल मिळवून देणारे आणि चाकण औद्योगिक वसाहतीचा कणा म्हणून ओळखले जाणारे महाळुंगे इंगळे गाव आज ‘वाहतूक कोंडीचे केंद्र’ बनत चालले आहे. चाकण-तळेगाव तसेच महाळुंगे-आंबेठाण रस्त्यावर दररोज निर्माण होणार्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचा फोलपणा उघड झाला आहे.
बुधवारी सकाळपासूनच महाळुंगे-आंबेठाण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासंतास वाहतूक खोळंबल्याने कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महाळुंगे इंगळे परिसराने राज्याच्या महसुलात मोठे योगदान दिले असले तरी येथे मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव आहे. एमआयडीसीने मोठ्या उद्योगांना जागा उपलब्ध करून दिली; मात्र त्यानुसार रस्ते रुंदीकरण, वाहतूक नियोजन याकडे दुर्लक्ष झाले.
अरुंद रस्ते, वाढते नागरीकरण आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळणे कठीण होत असून कामगारांचे कामाचे तास वाया जात आहेत. महसूल आम्ही द्यायचा आणि बदल्यात कोंडी सहन करायची का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महाळुंगे-आंबेठाण रस्ता तातडीने रुंद करावा, अतिक्रमणे हटवावीत आणि वाहतूक व्यवस्थेचा शाश्वत आराखडा तयार करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात जनआक्रोश उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आश्वासनांची रेलचेल, कृती शून्य
निवडणुकांच्या काळात उड्डाणपूल, रुंद रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या अनेक घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात या समस्या कायमच राहतात. प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात; पण दीर्घकालीन नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसतो.
अतिक्रमणे आणि कचर्याचा प्रश्न गंभीर
महाळुंगे-आंबेठाण रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे ही वाहतूक कोंडी मोठी कारणे ठरत आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या टपर्या आणि दुकाने यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यातच कचर्याचे ढीग आणि अपुर्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.




