पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रेंजहिल ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रोच्या भुयारी मार्गातील ओव्हरहेड केबलमध्ये (ओएचई) बिघाड झाल्यामुळे मेट्रो बंद पडली. त्यामुळे दुपारी तासभर मेट्रो सेवेवर परिणाम झाला. या काळात मेट्रो सेवा एकाच मार्गावर घेतल्यामुळे अनेक मेट्रोंचे डायव्हर्जन करण्यात आले. शिवाजीनगरचा एकच प्लॅटफॉर्म सुरू असल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.
शिवाजीनगर ते रेंजहिल दरम्यान ओएचईमध्ये बिघाड झाल्यामुळे दुपारी दोन वाजून ४० मिनिटांनी सेवा अचानक बंद झाली. त्यामुळे प्रवाशांना काय झाले, हे समजले नाही. शेवटी प्रवाशांना दुसऱ्या मेट्रोमध्ये बसविण्यात आले. ओएचईमध्ये बिघाड झाल्यामुळे शिवाजीनगर ते रेंजहिल दरम्यान एकाच मार्गावर मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला.
शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे पुण्याकडून पिंपरीकडे जाणारा एकच प्लॅटफॉर्म सुरू ठेवण्यात आला होता. हा बिघाड व्यवस्थित करण्यासाठी ४० मिनिटे लागली. या काळात एकाच मार्गावरून गाड्या चालविण्यात आल्या. त्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळवावे लागले. परिणामी एक तासभर मेट्रो सेवा विस्कळित झाली होती. यापूर्वी वीज गायब झाल्यामुळे मेट्रो बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आता भुयारी मार्गातील एक लाइनच्या ओएचईमध्ये बिघाड झाल्याचा फटका प्रवाशांना बसला.