पिंपरी, दि. 20 – पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टोरंट असोसिएशनची मासिक सभा मंगळवारी (दि. 20) चिंचवड येथे पार पडली. हॉटेल व्यवसायातील अडचणींवर चर्चा करत महापालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागासोबत चर्चा करून अडचणी सोडविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीसाठी अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, सचिव सत्यविजय तेलंग, उपाध्यक्ष रमेश तापकीर, राकेश शेट्टी, बापूसाहेब फटांगरे, सभासद शंकर चक्रवर्ती, सुमित बाबर, उल्हास शेट्टी, तेजस जुनवणे, नितीन तेली आदी उपस्थित होते.
करोना काळात उद्भवलेल्या आर्थिक संकटांमुळे हॉटेल व्यावसायिकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढलेली राज्य उत्पादन शुल्क फी, हॉटेलच्या वेळेबाबत पोलिसांचे नियम, ओला कचरा विल्हेवाटीचे महापालिकेचे धोरण, लॉज धारकांच्या अडचणी, स्वीगी, झोमॅटो यांच्या दरांमुळे हॉटेल व्यावसायिकांची होणारी आर्थिक परवड आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याशी चर्चा करून हॉटेलच्या वेळेबाबत मार्ग काढला जाईल. शहरातील बेकायदेशीर मद्यविक्रीबाबत उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त वी एम सूर्यवंशी यांचीही भेट घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.