Medha Kulkarni : नागरिकांचा श्वास गुदमरतोय? खासदार मेधा कुलकर्णी संतापल्या; ‘तो’ प्रकल्प तातडीने हटवण्याचे आदेश
Medha Kulkarni : लहान मुले आणि ज्येष्ठांना श्वसनाचे गंभीर विकार; अवजड वाहतूक आणि बेजबाबदार चालकांवर कारवाई करण्याची सूचना.

Medha Kulkarni – सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द परिसरातील रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांटमुळे वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे प्लांट तातडीने येथून स्थलांतरीत करावेत, असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी महापौर व महापालिका आयुक्तांना सुचविले आहे.
खासदार कुलकर्णी यांनी शनिवारी दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रयेजा सिटी, मधुकोष सोसायटी, धायरी लेन व फॉर्च्युनर सोसायटी परिसरातील अनधिकृत आरएमसी प्लांटची पाहणी केली. यावेळी नियमांचे उल्लंघन, प्रचंड धूळप्रदूषण तसेच मिक्सर व डंपरमुळे होणारी वाहतूक कोंडी या बाबी निदर्शनास आल्या.
सिमेंटची धूळ घरांमध्ये शिरत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे त्रास होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. तसेच, रस्त्यावर सांडणाऱ्या सिमेंटमुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढत आहेत. काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असून मोबाइलवर बोलताना दिसतात.
यापूर्वी एका महिलेचा मिक्सरखाली मृत्यू झाल्याची घटना घडूनही कारवाई झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली. या परिसरातील रस्ते अरुंद असूनही अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही वाहनांवर नंबर प्लेट नसून दंडही प्रलंबित असल्याचे समोर आले.
यावेळी गणेश पिंपळे, प्रितेश चांडगे, पवन मोकाशी, संतोष कुलकर्णी, राजेंद्र पाटील, शर्मिला नाखरे, निलेश घोडके, शेखर लोहोटे, प्रशांत गोहाड, मनीष वैद्य, गिरीश चोरघे, स्वाती टिळक, मंगला ठाकरे, नंदिनी कुलकर्णी, हरिहर घोडके, वासुदेव गोहाड यांच्यासह प्रयेजा पुरम, प्रयेजा सिटी या सोसायटीमधील नागरिक यावेळी उपस्थित होते.





