Nepal Floods : नेपाळमधील महापूर म्हणजे ‘हिमालयन त्सुनामी’; परराष्ट्र मंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय मदतीबद्दल आभार
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी देशात मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणणाऱ्या महापुराचे वर्णन 'हिमालयन त्सुनामी' असे केले आहे.

Nepal Floods : नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी देशात मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणणाऱ्या महापुराचे वर्णन ‘हिमालयन त्सुनामी’ असे केले आहे. या कठीण काळात मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पाठिंब्याबद्दल व एकजुटीबद्दल त्यांनी शेजारील देश आणि जागतिक समुदायाचे आभार मानले आहेत. काठमांडूस्थित आंतरराष्ट्रीय राजनैतिक अधिकाऱ्यांसमोर माहिती देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
२६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ आणि खडकांच्या दरडी कोसळल्यामुळे अचानक पूर (फ्लॅश फ्लड्स) आला होता, ज्यामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावे उद्ध्वस्त झाली. गुरुवारी बाधित भागातून आणखी मृतदेह हाती लागल्याने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १,२५० च्या पुढे गेला असून, ४,८०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. बाधित भागात शोध आणि बचाव कार्य अधिक तीव्र करून नागरिकांचे प्राण वाचवणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे खनाल यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी एका मुलाखतीत, कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार असणाऱ्या चीन, अमेरिका आणि भारत यांसारख्या मोठ्या औद्योगिक देशांनी नेपाळसारख्या असुरक्षित राष्ट्रांना भरपाई देणे ही त्यांची ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे खनाल यांनी म्हटले होते. पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनीही या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडण्यावर भर दिला आहे.
ठोस पावले उचलण्याची गरज
राजकीय व राजनैतिक अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध देशांचे राजदूत, संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संकटसमयी नेपाळ सरकार परदेशी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, भविष्यातही आंतरराष्ट्रीय समुदायासोबत जवळचे सहकार्य कायम ठेवले जाईल, असे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. हवामान बदलामुळे हिमालयात निर्माण होणाऱ्या अशा धोक्यांवर मात करण्यासाठी जागतिक पातळीवर ठोस पावले उचलण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.





