पुण्यात येरवडा कॉमरझोन आयटी पार्कला भीषण आग; जवानांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

पुणे : आज सकाळी साडेसातच्या सुमारास (७.४५ वा.) येरवडा येथील कॉमरझोन आयटी पार्कच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
येरवडा, खराडी, नायडू व धानोरी अग्निशामक केंद्रांतील जवानांनी होजपाईप तसेच आयटी पार्कमधील स्थायी अग्निशमन यंत्रणेचा वापर करून अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग इतरत्र पसरून मोठा अनर्थ घडण्यापासून बचाव झाला.
या आगीत कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे, इलेक्ट्रिक साहित्य व इतर वस्तू जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, नायडू अग्निशामक केंद्रातील फायरमन सोन्यादादा नायडू यांना पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या शौर्यपूर्ण कारवाईमुळे आयटी पार्कमधील शेकडो कर्मचाऱ्यांचा जीव वाचल्याचे नागरिकांनी सांगितले.





