Manoj jarange : ‘MPSC’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनोज जरांगेंची उडी; सगळे दौरे रद्द करून अचानक पुण्यात दाखल

Manoj Jarange | MPSC students । Pune : राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल मध्यरात्री १.१३ वाजता आंदोलन सुरू केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू केलं होतं. पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरुन पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती.
दरम्यान, अश्यातच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे आपले सर्व दौरे रद्द करून अचानक पुण्याकडे रवाना झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पाटील दाखल झाले. या भेटीमुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट पाठिंबा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
जरांगे पाटील म्हणाले की, ‘मी माझे सगळे दौरे रद्द करून अचानक पुण्याला निघालोय. एक ते दीड लाख MPSC विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्यांची चूक नसतानाही त्रास दिला जातोय. सरकारच्या चुकीमुळे एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार असाल तर मोठी शोकांतिका आहे.
मी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीसोबत आणि विखे पाटलांसोबत देखील चर्चा केलेली आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने मार्ग काढा असं मी मुख्यमंत्री यांच्याकडे निरोप पोहोचवला आहे’. असं देखील ते यावेळी म्हणाले.





