Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा
जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरून धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी हा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Gunaratna Sadavarte – मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन उपोषण करणार आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून त्यांच्याकडूनही प्रतिआंदोलन उभारण्यात येत आहे.
त्यातच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बीडमध्ये विराट मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी जरांगेंना भाषणातून धमकी देऊन वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या विराट मोर्चाच्या सभेदरम्यान आणि शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी जरांगे यांच्याबद्दल विविध वक्तव्य करत जाहीर टीका केली होती.
सदावर्ते यांच्या भाषणातील मुद्दे आणि आक्षेपार्ह टीकेसंदर्भाने जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरून धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी हा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.




