Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील आज भोरच्या दौऱ्यावर ; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

प्रभात वृत्तसेवा
भोर – मराठा नेते मनोज जरांगे पाटील शनिवारी (ता. ९) भोर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजता भोर शहरात पाटील यांचे प्रस्थान होणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता भोर मधून रायरेश्वर किल्ल्यावर जाणार आहेत. या ठिकाणी शिव मंदिरात ११ वाजता अभिषेक होणार आहे. भोर शहरात दुपारी १ वाजता येणार असून भोरमध्ये यशवंत लॉन्स येथे दुपारी ३ वाजता समाज बांधव व कार्यकर्ते यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.
भोरमध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यांवर, भोर तालुक्यातील शासकीय जळीत दप्तर, रायरेश्वर विकास, स्वराज्य शपथदिन आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, ते समाजाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाठीभेटी घेण्यात येणार आहे.कोणताही राजकीय विचार न करता समाजासाठी एकत्र येण्याची विनंती करत २९ ऑगस्टला मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाला व जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन भोर तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष संजय भेलके यांनी केले आहे.



