प्रभात वृत्तसेवा पुणे – शासकीय सेवा व विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज आणि जलद पोहोचावा, या उद्देशाने सोमवार पेठ व रास्ता पेठ येथे सुरू करण्यात आलेल्या महा ई-सेवा केंद्रांतून आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे.सर्वसामान्यांना शासकीय कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि अनावश्यक फेऱ्या वाचत आहेत. या ठिकाणी नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत. याबाबत विशाल दरेकर म्हणाले, की जनसंपर्क मोहिमेदरम्यान सोमवार व रास्ता पेठ परिसरात सुरू असलेल्या या केंद्रांतून उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ई-श्रम कार्ड, शहरी गरीब कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. नागरिकांचा प्रतिसाद या महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ७ हजार विविध दाखले, ४ हजार १७४ आधार कार्ड, ४ हजार शहरी गरीब कार्ड, ४ हजार ४२९ मतदान ओळखपत्रे, तसेच १ हजार ८०० ई-श्रम कार्ड नागरिकांना वितरित करण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, केंद्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.