Manikrao Kokate : ‘रमी खेळा, काहीतरी जिंका अन् मला पाठवा’; नाशिकच्या शेतकऱ्याकडून कोकाटेंची थट्टा, मनीऑर्डरही पाठवली

नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि विधानसभेत रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर, निफाड तालुक्यातील देवगाव येथील तरुण शेतकरी योगेश खुळे यांनी अनोख्या पद्धतीने आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी 5550 रुपयांची मनीऑर्डर थेट कृषीमंत्री कार्यालय, मुंबई येथे पाठवून, “हे पैसे वापरून माझ्यासाठी रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा,” अशी उपरोधिक विनंती केली आहे.
योगेश खुळे यांनी यंदाच्या हंगामासाठी प्रत्येकी 1850 रुपये किमतीच्या तीन बियाण्यांच्या पिशव्या, म्हणजेच 5550 रुपयांचे बियाणे खरेदी केले होते. मात्र, सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने जमीन नापीक झाली आणि बियाणे पेरता आले नाही. परिणामी, उत्पन्नाचा मार्ग बंद झाला.
अशा परिस्थितीत कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ पाहून खुळे यांनी उपहासाने भरलेला, पण वेदनेने ओथंबलेला टोला लगावला. त्यांनी बियाणे विकून मिळालेले 5550 रुपये मनीऑर्डरद्वारे कोकाटेंना पाठवले आणि म्हणाले, माझं बियाणे पडून आहे, उत्पन्न नाही, रमीही खेळता येत नाही. म्हणून मी पैसे तुम्हाला पाठवले, माझ्यासाठी रमी खेळा आणि काही जिंका!
कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी X वर शेअर केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे. कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना, “मी रमी खेळत नव्हतो, फक्त मोबाईलवरील जाहिरात स्कीप करत होतो,” असा दावा केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटे यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
योगेश खुळे यांनी मनीऑर्डर पाठवून व्यक्त केलेला उपहास शेतकऱ्यांच्या सखोल वेदनेचे प्रतीक आहे. नाशिक जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सततच्या नापिकी, हवामान बदल, अनियमित पावसाळा आणि अपुऱ्या सरकारी मदतीमुळे संकटात आहेत. शेतकऱ्यांच्या या व्यथेने कृषी धोरणे, बियाण्यांचे नुकसान आणि बेभरवशाच्या जीवनशैलीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोकाटे यांच्या मंत्रिपदावरून हकालपट्टीची मागणी जोर धरत असताना, शेतकरी खुळे यांच्या या अनोख्या आंदोलनाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.





