नाशिक हादरले! ऑनलाइन गेममुळे 16 वर्षीय मुलाने गमावला जीव

नाशिक : नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड, डायना नगर येथे राहणाऱ्या 16 वर्षीय सम्राट भालेराव या मुलाने ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या सम्राटने सोमवारी रात्री राहत्या घरी गळफास घेतला. सकाळी कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्याच्या पश्चात आई आणि दोन लहान बहिणी आहेत. नाशिक रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
दुसरीकडे, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात ऑनलाइन गेममुळे एका शेतकऱ्याचे 5 लाख रुपये बुडाले. शेतकऱ्याने म्हशी खरेदीसाठी बँक खात्यात 7 लाख रुपये साठवले होते. मात्र, त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने ‘फ्री फायर’ गेम खेळताना अॅप डाउनलोड केले आणि काही क्षणातच खात्यातील 5 लाख रुपये गायब झाले. सायबर पोलिसांनी ट्रान्झेक्शन आयडीच्या आधारे तपास केला. यापूर्वी कोल्हापुरात डिजिटल अरेस्टमुळे साडेतीन कोटी आणि आठ कोटींची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
या घटनांमुळे पालकांना मुलांना मोबाईल देताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा मिळाला आहे. ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे होणारे आर्थिक आणि मानसिक नुकसान टाळण्यासाठी जागरूकता आणि नियंत्रणाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.





