Ambadas Danve : महाराष्ट्रात रमीला राजमान्यता द्या, तातडीने अध्यादेश काढा; कोणी केली मागणी?

Ambadas Danve on Manikrao Kokate : महाराष्ट्राच्या विधिमंडळात सध्या एका वेगळ्याच मुद्द्याने खळबळ उडवली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कोकाटे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी कोकाटेंवर जोरदार टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.
रमीला राजमान्यता द्या, अध्यादेश काढा : दानवे
अंबादास दानवे यांनी कोकाटेंवर सडकून टीका करताना म्हटलं, “कृषीमंत्र्यांनी प्रामाणिकपणे कबूल करावं की ते रमी खेळत होते. रमी खेळताना डोकं खाजवावं लागतं का? पॉप-अप आला म्हणून डोकं खाजवायची गरज आहे का? तुम्ही महाराष्ट्राचे कृषीमंत्री आहात, पण असं असंवेदनशील वागणं शोभतं का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोकाटेंचा राजीनामा घ्यावा आणि रमीला राजमान्यता द्यावी. तातडीने अध्यादेश काढून बिनधास्त रमी खेळण्याची परवानगी द्यावी!” दानवेंनी पुढे थट्टेने म्हटलं, “झूम करून पाहिलं तर कोकाटे कोणती पत्ती खेळत होते, हेही कळेल. इतर राज्यांत रमीवर बंदी आहे, मग महाराष्ट्रात का नाही? या प्रकरणाने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.”
मी रमी खेळलोच नाही, कोकाटेंचं स्पष्टीकरण
कोकाटे यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना सांगितलं, “हा छोटासा विषय आहे, पण तो इतका का ताणला गेला, हे कळत नाही. ऑनलाइन रमी खेळण्यासाठी बँक खातं जोडावं लागतं. माझा कोणताही मोबाईल नंबर किंवा बँक खातं रमीच्या अॅपशी जोडलेलं नाही. मी रमी खेळतच नाही, मला ती खेळताही येत नाही. ज्या दिवसापासून ऑनलाइन रमी सुरू झाली, तेव्हापासून मी एक रुपयाचीही रमी खेळलेली नाही. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत, आणि ज्यांनी माझी बदनामी केली, त्यांना मी कोर्टात खेचणार आहे.”
कोकाटे पुढे म्हणाले, “त्या दिवशी मी सभागृहात होतो. मला माझ्या OSD कडून माहिती हवी होती, त्यासाठी मी मोबाईल मागवला. तो नवीन मोबाईल होता, आणि त्यावर गेमचा पॉप-अप आला. मी तो स्किप करण्याचा प्रयत्न केला, पण मला वेळ लागला. माझा व्हिडीओ फक्त 11 सेकंदांचा आहे, पण मी गेम स्किप केल्याचा भाग दाखवला गेला नाही. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर सत्य समोर आलं असतं. 30 सेकंदांत गेम स्किप करता येत नाही, आणि माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.”





