माणिकराव कोकाटेंकडील कृषी खाते काढून घेणार? ‘हा’ बडा नेता होणार नवा कृषिमंत्री?

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि विधिमंडळात रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडिओमुळे महायुती सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे. ठिकठिकाणी आंदोलने आणि अजित पवार गटाच्या नेत्यांसमोर पत्ते उधळण्याच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, कोकाटे यांनी “मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही,” असे ठणकावून सांगितले आहे.
वादग्रस्त वक्तव्यांची मालिका आणि सरकारची कोंडी-
माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि वर्तन यामुळे महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे. “सरकार भिकारी आहे,” असे कोकाटेंचे अलीकडचे वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटेंच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे कोकाटेंच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खुर्ची जाणार? नव्या मंत्र्याच्या नावाची चर्चा
सूत्रांनुसार, कोकाटेंकडील कृषी खाते काढून घेण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. त्यांचे खाते मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दिले जाण्याची शक्यता आहे. आज कोकाटे यांनी अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येण्याचे ठरले होते. दुपारी तीन वाजता त्यांची बैठक नियोजित होती, परंतु अजित पवारांनी ही भेट रद्द केल्याने कोकाटेंची मंत्रिपदाची खुर्ची जाण्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
विरोधकांचा दबाव आणि पक्षाची नाराजी –
विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला आहे. “छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांचा तात्काळ राजीनामा घेतला गेला, धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्यात आला. मग कोकाटेंचा राजीनामा कधी?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही कोकाटेंना पाठिशी घालण्याची तयारी नसल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटेंची गच्छंती अटळ आहे.
दरम्यान, कोकाटेंच्या वक्तव्यांमुळे आणि व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादामुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता कोकाटेंचे मंत्रिपद कायम राहणार की त्यांच्याकडील खाते काढून घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.





