Manchar News: अजितदादांच्या जयंतीनिमित्त महिला शक्तीचा जागर! कर्तृत्ववान महिलांचा दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते गौरव
Manchar News: मुलींना दर्जेदार शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळाल्यासच सक्षम समाज घडेल; शिवगिरी मंगल कार्यालयातील सोहळ्यात वळसे पाटलांचे प्रतिपादन

Manchar News – “आज महिलांनी शिक्षण, उद्योग, शेती, क्रीडा, प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. समाजाची उंची मोजायची असेल तर महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरण पाहणे आवश्यक आहे.मुलींना दर्जेदार शिक्षण, सुरक्षित वातावरण आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळाल्यास सक्षम समाजाची निर्मिती होईल,” असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार दि.२६ रोजी केले.
स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहांतर्गत महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजिका, प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी तसेच राष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडूंचा गौरव सोहळा मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सभापती कैलास बुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी ,जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णूकाका हिंगे पाटील, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र करंजखेले,शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर,बाजार समितीचे सभापती निलेश थोरात,उपसभापती सचिन पानसरे,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, माजी अध्यक्ष भगवान वाघ,पंचायत समितीच्या सदस्या उषा कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यात पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा, रक्तदान शिबिरे आणि महिला सक्षमीकरण असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल किंवा इमारती नव्हेत, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, रोजगार व संधी पोहोचणे महत्त्वाचे आहे.
शरद सहकारी बँक,अनुसया उन्नती केंद्र, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून महिलांना संधी उपलब्ध करून देण्यात येत असून अशा सन्मान सोहळ्यांतून इतर महिलांनाही प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सत्कारार्थिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पडवळ, प्रास्ताविक सुषमा शिंदे तर आभार अक्षदा शिंदे यांनी मानले.





