Burger King Camp Pune : पुण्यात तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई.! कॅम्पमधील प्रसिद्ध ‘Burger King’चा परवानाच केला रद्द; अवस्था पाहून अधिकारीही चक्रावले…
एफडीएच्या या मोहिमेत केवळ Burger Kingच नव्हे, तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील एकूण १६ हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि दुग्ध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

Burger King Camp Pune : पुण्याच्या कॅम्प परिसरात गेल्यानंतर ‘बर्गर किंग’चा बर्गर खाणं हा अनेक पुणेकरांसाठी जणू एक वेगळाच अनुभव मानला जातो. कॅम्पच्या खाद्यसंस्कृतीत या बर्गर जॉईंटची स्वतःची अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र, याच प्रसिद्ध बर्गर जॉईंटवर आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. कॅम्पमधील ‘Burger King’चा अन्न व्यवसाय परवाना एफडीएने तात्काळ निलंबित केला आहे. या कारवाईमुळे पुण्याच्या खाद्यविश्वात मोठी चर्चा रंगली आहे.
अन्नाच्या चवीसाठी आणि वेगळ्या प्रकारच्या बर्गरसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी एफडीएच्या तपासणीदरम्यान स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याचे विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मोठ्या आणि लोकप्रिय ब्रँडलाही अन्नसुरक्षेच्या नियमांपासून कोणतीही सूट मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पुणे विभागातील ११ ते १४ ऑगस्टदरम्यान राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत एकूण १६ आस्थापनांवर परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘ॲक्शन मोड’
महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या मोहिमेअंतर्गत ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. पुणे विभागातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ई-कॉमर्स आणि दुग्ध व्यवसायांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आस्थापनांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) डी. व्ही. भोगावडे यांनी तपासण्यांमध्ये अनेक आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांच्या पालनासंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्याचे सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे विभागातील १६ आस्थापनांवर कारवाई :
एफडीएच्या या मोहिमेत केवळ Burger Kingच नव्हे, तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील एकूण १६ हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि दुग्ध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये पुण्यातील Burger Kingसोबत Fortune Enterprises (Hotel Sayaji), Hotel Chul Mutton, Simply South, JBM Hospitality Canteen यांचा समावेश आहे. तसेच Zepto, Blink Commerce आणि इतर ई-कॉमर्स आस्थापनांवरही कारवाई झाली. सातारा परिसरातील Domino’s Pizza आणि Pizza Hut यांच्यावरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मुंढेंच्या कारवाईचा धडाका कायम :
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तपासणी मोहिमा सुरू आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे व्यवसाय तसेच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विविध आस्थापनांची तपासणी केली जात आहे.
कारवाईचे प्रमुख कारणे :
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कँप येथील बर्गर किंग आऊटलेटला अचानक भेट देऊन पाहणी केली असता, तेथे अन्नसुरक्षा आणि गुणवत्तेसंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.
प्रचंड अस्वच्छता : किचन आणि अन्न साठवणुकीच्या जागी भीषण अस्वच्छता आढळली, जे कारवाईचे प्रमुख कारण ठरले.
अन्न मानकांचे उल्लंघन : खाद्यपदार्थ तयार करताना आणि साठवताना एफडीएच्या (FSSAI) नियमावलीचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे समोर आले.
आरोग्यास धोका : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने प्रशासनाने कोणताही विलंब न करता तात्काळ परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.







