पुणे – बर्गरकिंगच्या बर्गरमध्ये आढळले काचेचे तुकडे

पुणे – शहरातील प्रसिद्ध अशा बर्गरकिंगमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बर्गर खाल्ल्यामुळे एका रिक्षा चालकाच्या घशाला गंभीर इजा झाली आहे. साजिद अजमुद्दीन पठाण (31, रा. जुनी वडारवाडी ) असे घशाला इजा झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी डेक्कन पोलिसांत बर्गरकिंग मधील एरिया मॅनेजर, स्टोअर मॅनेजर व सुपरवाझर या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (दि.15) रोजी दुपारी तीनच्या सुमारास एफ.सी रोड येथील बर्गरकिंग डेक्कन येथे घडला आहे.

फिर्यादी साजिद पठाण हे व्यावसायाने रिक्षा चालक असून बुधवारी ते आपल्या मित्रांसोबत सदर ठिकाणी असलेल्या बर्गरच्या दुकानात बर्गर खाण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी बर्गरची ऑर्डर दिली. मात्र बर्गर खात असतानाच साजिद यांना घशात काहीतरी टोचल्यासारखे वाटले. त्रास होऊन दुखायला लागल्यामुळे त्यांनी त्याच्यावर थंडपेय घेतले. परंतु त्याचवेळी त्यांच्या घशातून रक्त येऊ लागले. तसेच त्यांना उलटीचा त्रास देखील होऊ लागला. त्यानंतर त्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घरामध्ये इतर कोणी नसल्यामुळे त्यांनी रविवारी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे अधिक तपास करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.