Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट! कोल्हापूर- सोलापूरचा दबदबा; पुण्याच्या मल्लाची दुखापतीमुळे माघार
Maharashtra Kesari 2026 : नेक मल्लांनी १०-० आणि ११-० अशा एकतर्फी गुणफरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर काही ठिकाणी दुखापतीमुळे मल्लांना माघार घ्यावी लागली.

Maharashtra Kesari 2026 Final Lineup : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ‘रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशन’ आयोजित या स्पर्धेत आज ६१ आणि ८६ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीचे (Semi-finals) सामने पार पडले असून, विजेतेपदासाठी कोणाकोणात झुंज होणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी माती आणि गादी अशा दोन्ही विभागात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. अनेक मल्लांनी १०-० आणि ११-० अशा एकतर्फी गुणफरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर काही ठिकाणी दुखापतीमुळे मल्लांना माघार घ्यावी लागली.
माती विभाग: सोलापूर आणि कोल्हापूरची जोरदार मुसंडी Maharashtra Kesari 2026
View this post on Instagram
माती विभागातील ६१ किलो गटात कोल्हापूरच्या अजय कापडेने साताऱ्याच्या गोरख कोळेकरचा १०-० असा धुव्वा उडवला. आता त्याची अंतिम लढत पुण्याच्या अमोल वालगुडेशी होईल, ज्याने पुणे शहराच्या अमित कुळालचा ११-० असा पराभव केला. ८६ किलो गटात बीडच्या अविनाश शिंदेने सोलापूरच्या प्रणव हांडेवर १२-२ अशी मात करत फायनल गाठली.
दरम्यान, दुसऱ्या उपांत्य लढत सोलापूरच्या बिरुदेव बनसोडे आणि पुण्याच्या अनिल कचरे यांच्यात रंगली. अत्यंत चुरशीची ही लढत सुरू असतानाच अनिल कचरेच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला लढतीतून माघार घ्यावी लागल्याने सोलापूरच्या बिरुदेव बनसोडेला ‘वॉकओव्हर’ मिळाला आणि त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला.
View this post on Instagram
गादी विभाग: कोल्हापूरच्या मल्लांचे वर्चस्व – Maharashtra Kesari 2026
गादी विभागातील ६१ किलो गटात कोल्हापूरचे वर्चस्व पाहायला मिळाले. विवेक धावडे (कोल्हापूर) आणि वैभव पाटील (कोल्हापूर शहर) यांनी अनुक्रमे १०-० आणि ११-० अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याचे निश्चित केले आहे. ८६ किलो गटात सोलापूरच्या विकास कार्ये याने कोल्हापूरच्या नितीन चव्हाणवर मात केली, तर ठाण्याच्या सुरज माने याने सोलापूरच्या गोपीनाथ सुतारचा ८-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा – Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीचा थरार; सिकंदर शेख, महेंद्र गायकवाडची विजयी घोडदौड कायम! माऊली जमदाडेला धोबीपछाड
या निकालांमुळे आता विविध जिल्ह्यांतील मल्ल मानाच्या पदकासाठी आणि गदेसाठी सज्ज झाले असून, अंतिम लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.





