Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीचा ‘फायनल’ थरार! सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड , हर्षवर्धन सदगीर, जय पाटील अंतिम फेरीत दाखल
Maharashtra Kesari 2026 : गादी आणि माती या दोन्ही विभागांतील उपांत्य फेरीचे (Semi-finals) निकाल जाहीर झाले असून, किताबी गदेसाठीचे अंतिम चार मल्ल निश्चित झाले आहेत

Maharashtra Kesari 2026 Four Finalists Confirm : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आता शिगेला पोहोचला आहे. गादी आणि माती या दोन्ही विभागांतील उपांत्य फेरीचे (Semi-finals) निकाल जाहीर झाले असून, किताबी गदेसाठीचे अंतिम चार मल्ल निश्चित झाले आहेत.
स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त रंगलेल्या स्पर्धेत शनिवारी ऐतिहासिक लढती पाहायला मिळाल्या. कुस्ती शौकिनांच्या श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यांनंतर गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, तर माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.
गादी विभाग: जय पाटीलची ‘चितपट’ एन्ट्री –
गादी विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या जय पाटीलने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला पहिल्याच मिनिटाला ‘चितपट’ करून दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलवर ६-२ अशा फरकाने मात करत फायनलचे तिकीट पक्के केले. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील यांच्यातील लढत रंजक ठरली होती, ज्यात पृथ्वीराजने १०-६ ने बाजी मारली होती.
माती विभाग: ‘बाहुबली’ महेंद्र विरुद्ध ‘रूद्रावतार’ सिकंदर
माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाडने रविराज चव्हाणचा १०-० असा एकतर्फी पराभव करून आपला दरारा सिद्ध केला. दुसऱ्या अटीतटीच्या लढतीत हिंगोलीच्या सिकंदर शेखने अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरवर ४-३ असा निसटता पण थरारक विजय मिळवला. सुदर्शनने सुरुवातीला ३-० अशी आघाडी घेतली होती, मात्र सिकंदरने चपळाईने गुण मिळवत शेवटच्या क्षणी बाजी मारली.
उद्या होणाऱ्या अंतिम लढतींमध्ये आता ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा कोण उंचावणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सोलापूरचे दोन मल्ल दोन वेगवेगळ्या विभागातून फायनलमध्ये पोहोचल्याने सोलापूर जिल्ह्याचा वरचष्मा पाहायला मिळत आहे.





