Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीचा थरार; सिकंदर शेख, महेंद्र गायकवाडची विजयी घोडदौड कायम! माऊली जमदाडेला धोबीपछाड
Maharashtra Kesari 2026 : कुस्ती शौकीनांच्या नजरा लागलेल्या माती विभागात सोलापूरच्या मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले, मात्र एका अनपेक्षित निकालाने सर्वांनाच चकित केले.

Maharashtra Kesari 2026 Semifinal Results : घोली येथील ‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गुरुवारी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. माती आणि गादी अशा दोन्ही विभागात रोमांचक सामने पाहायला मिळाले. कुस्ती शौकीनांच्या नजरा लागलेल्या माती विभागात सोलापूरच्या मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले, मात्र एका अनपेक्षित निकालाने सर्वांनाच चकित केले.
माती विभाग: सिकंदरचा दरारा, माऊलीचा पराभव –
माती विभागातील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत सोलापूरच्या सिकंदर शेखने पुणे जिल्ह्याच्या अनिकेत मांगडेचा ८-१ असा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसऱ्या एका लढतीत महेंद्र गायकवाडने विशाल बनकरवर ६-१ अशी मात करत पुढची फेरी गाठली. मात्र, सोलापूरच्याच माऊली जमदाडेला नाशिकच्या बाळू बोडकेने ५-१० अशा गुणफरकाने पराभूत करत स्पर्धेत मोठी खळबळ उडवून दिली.
गादी विभाग: शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळचा दबदबा –
गादी विभागात पुण्याच्या मल्लांनी एकतर्फी विजय मिळवले. शिवराज राक्षे याने प्रतीक जगतापचा १०-० असा धुव्वा उडवला, तर पृथ्वीराज मोहोळने जालन्याच्या अरुण चलावडेला १०-० असे आसमान दाखवले. ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत (सेमी फायनल) सोलापूरच्या शुभम दुधाळेने धुळ्याच्या तेजस आपलकरला चारीमुंड्या चितपट करत अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या अभिषेक कापडेने साताऱ्याच्या संदेश शिपकुलेचा ३-२ अशा निसटत्या फरकाने पराभव केला. कालांमुळे आता अंतिम फेरीत कोणाकोणाची गाठ पडणार आणि कोण ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेच्या दिशेने पाऊल टाकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





