Harshvardhan Sadgir Expressed : ‘डबल महाराष्ट्र केसरी झालो, पण स्वप्न अपूर्णच राहिलं’, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद दाखवली बोलून
Harshvardhan Sadgir Expressed : डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने निवृत्तीचा निर्णय का घेतला? याबाबत मनातील खदखद व्यक्त केली.

Double Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir Expressed my heartache : वाघोलीत पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाडचा ४-३ अशा फरकाने पराभव केला. या विजयासह हर्षवर्धन ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला खरा, मात्र विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी त्याने कुस्तीला कायमचा रामराम ठोकल्याची घोषणा करून कुस्ती जगतात खळबळ उडवून दिली आहे. यानंतर त्याने हा मोठा निर्णय का घेतला? याबाबत खुलासा करताना मनातील खदखद व्यक्त केली.
असा रंगला फायनलचा थरार –
या किताबी कुस्तीच्या सुरुवातीला महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेत १ गुण मिळवला होता. मात्र, अनुभवी हर्षवर्धनने संयमी खेळ करत महेंद्रचे सर्व डाव हाणून पाडले. पहिल्या फेरीत महेंद्रला वारंवार ताकीद देऊनही नियमानुसार खेळ न केल्याने हर्षवर्धनला १ गुण मिळाला आणि सामना १-१ असा बरोबरीत आला. दुसऱ्या फेरीत महेंद्रला ‘अॅक्टिव्हिटी पिरियड’मध्ये गुण मिळवता न आल्याने हर्षवर्धनला १ गुण मिळाला, त्यानंतर त्याने आणखी दोन गुण वसूल करत ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली. शेवटच्या क्षणी महेंद्रने १ गुण मिळवला, पण तोपर्यंत हर्षवर्धनने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.
“सरकारने गरज असताना शासकीय नोकरी दिली नाही…”
मानाची चांदीची गदा खांद्यावर घेताच हर्षवर्धनने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तो म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा ही मानाची गदा जिंकली होती, तेव्हा अनेकदा सरकारकडे शासकीय नोकरी मागायला गेलो, पण सरकारने मला नोकरी दिली नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यासोबतचे फोटो देखील माझ्याकडे आहेत, पण आता सरकारने मला शासकीय नोकरी दिली, तरी आता मला नको आहे. कारण मला जेव्हा गरज होती, तेव्हा ती मिळाली नाही.”
अशा प्रकारे हर्षवर्धन सदगीरने उघडपणे नाराजी व्यक्त करत, विजयाच्या अवघ्या १२ मिनिटांतच त्याने गादी विभागाच्या कुस्तीतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. एका महान मल्लाने अशा पद्धतीने निवृत्ती घेणे कुस्ती प्रेमींच्या जिव्हारी लागले असून, सोशल मीडियावर या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे.





