Maharashtra Kesari 2026 : सिकंदर शेखचा जखमी अवस्थेतही ‘रुद्रावतार’! नाकातून रक्त वाहत असतानाही प्रतिस्पर्ध्याला लोळवलं
Maharashtra Kesari 2026 : वाघोली येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी मैदानात गतविजेत्या सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे.

Maharashtra Kesari 2026 2nd round Results : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आता शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आज माती आणि गादी विभागातील दुसरी फेरी पार पडली. ज्यामध्ये दिग्गज मल्लांनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. जखमी असतानाही सिकंदर शेखने दाखवलेली जिद्द आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरली.
सिकंदर शेखच्या जिद्दीने वेधलं लक्ष –
वाघोलीच्या ‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त आज रंगलेल्या दुसऱ्या फेरीत मल्लांच्या जिद्दीचा आणि कौशल्याचा कस लागला. कुस्ती शौकिनांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते सिकंदर शेखने. कुस्ती सुरू असताना सिकंदरच्या नाकाला दुखापत होऊन रक्तस्त्राव होत होता, मात्र त्या अवस्थेतही आक्रमक पवित्रा घेत त्याने मनिष रायतेवर ८-२ अशा गुणांनी मात केली. टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी सिकंदरच्या या लढाऊ वृत्तीला दाद दिली.
गादी विभाग: शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळची सरशी
गादी विभागात अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. माजी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पुण्याच्या श्रेयस होळकरचा १-० अशा निसटत्या, पण महत्त्वाच्या फरकाने पराभव केला. सोलापूरच्या पृथ्वीराज पाटीलने सातपाल शिंदेचा ११-० असा धुव्वा उडवला. तर, पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने धीरज बारस्करला १२-२ असे अस्मान दाखवले. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने वेताळ शेळकेचा ८-१ असा पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली.
माती विभाग: महेंद्र गायकवाड आणि सिकंदरचा दबदबा
माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सागर देवकातेचा १०-० असा एकतर्फी पराभव केला. रविराज चव्हाणनेही १०-० अशा फरकाने विजय मिळवला. नाशिकच्या बाळू बोडकेवर विक्रमसिंग भोसलेने ४-१ अशी मात केली. या स्पर्धेदरम्यान ५ माजी महाराष्ट्र केसरींचा विशेष सन्मान करण्यात आला, ज्याने कुस्ती परंपरेचा गौरव झाला. माऊली जमदाडे, असलम काजी आणि अभिनेता गणेश परदेशी यांच्या उपस्थितीने मल्लांचा उत्साह द्विगुणित झाला होता.





