Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीचा थरार: अमोल वालगुडेची सुवर्ण हॅट्ट्रिक! अटीतटीच्या लढतीत बिरुदेव बनसोडेने मारली बाजी
Maharashtra Kesari 2026 : या स्पर्धेत पुण्याच्या अमोल वालगुडेने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे, तर सोलापूरच्या बिरुदेव बनसोडेने शेवटच्या क्षणी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.

Maharashtra Kesari 2026 Gold Medal Winners : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती आणि गादी विभागातील ६१ आणि ७९ किलो वजनी गटांचे निकाल जाहीर झाले आहेत. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतींमध्ये कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याच्या मल्लांनी सुवर्णपदकांवर आपली मोहोर उमटवली आहे.
‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त रंगलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी सुवर्णपदकांसाठी मल्लांमध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली. या स्पर्धेत पुण्याच्या अमोल वालगुडेने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे, तर सोलापूरच्या बिरुदेव बनसोडेने शेवटच्या क्षणी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.
माती विभाग: अमोल वालगुडे आणि बिरुदेवचे वर्चस्व –
६१ किलो वजनी गटात पुण्याचा अमोल वालगुडे पहिल्या फेरीत ७-२ असा पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत कोल्हापूरच्या अजय कापडेचा १०-८ असा पराभव केला आणि सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली. ७९ किलो गटात सोलापूरच्या बिरुदेव बनसोडे आणि बीडच्या अविनाश शिंदे यांच्यात ५-५ अशी बरोबरी झाली होती, परंतु कुस्तीच्या नियमानुसार शेवटचा गुण घेणाऱ्या बिरुदेवला विजयी घोषित करण्यात आले.
गादी विभाग: वैभव पाटील आणि विकास करे सुवर्णमयी –
गादी विभागातील ६१ किलो गटात कोल्हापूरच्या मल्लांमध्येच अंतिम लढत झाली. यात कोल्हापूर शहराच्या वैभव पाटीलने विवेक धावडेवर ११-१ अशा गुणाधिक्याने मात करत सुवर्णपदक जिंकले. ७९ किलो गटात सोलापूरच्या विकास करेने ठाण्याच्या सुरज मानेचा १०-० असा एकतर्फी पराभव करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.
दुखापतीचा फटका आणि कांस्यपदक विजेते –
पुण्याच्या अनिल कचरेला सेमीफायनलमध्ये उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली, ज्यामुळे सोलापूरच्या प्रणव हांडेला कांस्यपदक मिळाले. साताऱ्याचा गोरख कोळेकर, सांगलीचा पांडुरंग माने आणि साताऱ्याचा अरु खांडेकर यांनीही आपापल्या गटात कांस्यपदकावर नाव कोरले आहे.





