Lonikand : मोठा अनर्थ टळला.! मरकळ नदी पुलावरील पाणी हटवण्यासाठी पोलिसांसह ग्रामस्थांची जीवाची बाजी
पुलालगतून पाणी वाहू लागल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी लोणीकंद पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करत संबंधित रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केला.

Lonikand : लोणीकंद (Lonikand) नगर रोड ते आळंदी रोडवरील तुळापूर येथील इंद्रायणी नदी पुलावर पावसामुळे धोकादायकरीत्या पाणी साचल्याने तसेच पुलालगतून पाणी वाहू लागल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी लोणीकंद पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करत संबंधित रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केला.
पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह गावातील तीव्र उतारावरून पुलाकडे येत असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत एसीपी लोणीकंद अनिता मोरे तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या उपस्थितीत तातडीने बचावात्मक कामे हाती घेण्यात आली.
यावेळी पोलीस हवालदार रितेश काळे, निलेश नागवडे, नीलम कोळेकर व प्रवीण खोसे यांनी स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवले, संपत शिवले आणि श्रीकांत शिवले यांच्या सहकार्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदले. (Lonikand)
तसेच पुलावरील पाणी वाहून जाण्याचे मार्ग कचरा, गाळ व इतर अडथळ्यांमुळे बंद झाले होते. हे अडथळे तात्काळ हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात आला.
पोलीस आणि स्थानिकांच्या प्रयत्नाने पुलावर साचणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून संभाव्य अपघाताचा धोका टळला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
या वेळी ग्रामस्थांनी लोणीकंद पोलिसांचे तसेच सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशासनाच्या या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.





