Tamhini Ghat : पुणे-कोलाड महामार्गावर दरड कोसळली; ताम्हिणी घाटातील प्रवास टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) परिसराला बसला आहे.

Tamhini Ghat : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) परिसराला बसला आहे. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे–कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील निवे आणि डोंगरवाडी गावांच्या दरम्यान अतिवृष्टीमुळे रस्त्यालगतची संरक्षक भिंत ढासळली असून, अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय ताम्हिणी (Tamhini Ghat) आणि सरोळे गावांदरम्यान हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाट परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
रविवारी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्याच ठिकाणी आता संरक्षक भिंत कोसळल्याने अतिवृष्टीची तीव्रता स्पष्ट झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून, वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन आणि संबंधित यंत्रणा रस्ते मोकळे करण्याचे तसेच परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम करत आहेत. ताम्हिणी घाटातून (Tamhini Ghat) प्रवास करणाऱ्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






