पुणे – पुणेकरांनी नेहमीच विकासाच्या बाजूने आपला कौल दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २२ (क) काशेवाडी- डायलप्लाॅटमधील भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा खासदार आणि केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला. पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभागात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोहोळ यांनी मतदारांशी संवाद साधला. माजी आमदार जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र तरुण मंडळ येथून सुरुवात झालेल्या भव्य पदयात्रेमध्ये नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. खासदार मोहोळ यांनी या पदयात्रेत सहभागी होऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या वेळी बोलताना मोहोळ यांनी पाटील यांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. पाटील यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता जनप्रतिसाद पाहता, त्यांचा विजय निश्चित असून, जनता विकासाच्या बाजूने कौल देईल, असेही ते म्हणाले. या पदयात्रेत माजी आमदार मुळीक यांनी स्थानिक मतदारांच्या समस्या जाणून घेत, भाजपच या प्रभागाचा कायापालट करू शकते, असा विश्वास उपस्थितांना दिला. या पदयात्रेत मोठ्या संख्येचे भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, तसेच महिला सहभागी झाल्या होत्या.