Indapur Farmers Protest : इंदापूरच्या ३६ गावांचा एल्गार! सिंचन भवनासमोर मंत्र्यांसह नागरिकांचा ठिय्या; पाणी सोडल्याशिवाय माघार नाही
Indapur Farmers Protest : लेखी आश्वासन देऊनही पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांचा सिंचन भवनासमोर ठिय्या; कालवा फुटण्याच्या भीतीने केवळ मर्यादित पाणी सोडल्याचे पाटबंधारे विभागाचे स्पष्टीकरण.

Indapur Farmers Protest – जलसंपदा विभागाने वेळोवेळी आश्वासन देऊनही उन्हाळी आवर्तन न सोडल्याने इंदापूर तालुक्याच्या ३६ गावांतील नागरिकांनी संतप्त होऊन सोमवारी सिंचन भवनाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सहभागी झाले होते, तसेच विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
दरम्यान, कृषिमंत्री भरणे, माजी मंत्री पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणे यांनीही आंदोलन स्थळी उपस्थिती दर्शवून खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन तातडीने पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवत दिवसभर कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतून इंदापूर आणि दौंड तालुक्यातील सिंचनासाठी पाण्याचा कोटा आरक्षित आहे. त्यानुसार वर्षभरातून दोन टप्प्यांत उन्हाळी आवर्तन निश्चित करण्यात आले. याबाबत आमदार रोहित पवार यांनी दोनदा अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानुसार पाटबंधारे विभागाने ७ मे रोजी लेखी पत्र देत १२ मे रोजी पाणी सोडण्याचे मान्य केले होते.
जनाई शिरसाई योजनेअंतर्गत सोडण्यात इंदापूर तालुक्यातील ३६ गावांचा समावेश होतो, तर बारामती तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. जलसंपदा विभागासोबत वारंवार बैठका घेऊन कार्यवाही न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या वेळी जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पिके करपल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, तर फुरसुंगी येथील कालवा जुना झाला असून, तो फुटण्याच्या शक्यतेचे कारण देऊन केवळ एक हजार क्युसेक्स पाणी सोडल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाकडून देण्यात आले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत तक्रार…
पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कोणत्याही तालुक्याला कमी, जास्त पाणी न देता समांतर पाणी मिळावे म्हणून नियोजन केले आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन तालुक्यांत वाद निर्माण होत असून, मंगळवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करणार असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी या वेळी सांगितले.






