Pimpri-Chinchwad – चिंचवडमध्ये कोयत्याचा वार करीत रोकड लुटणाऱ्या टोळीला अवघ्या २४ तासांत गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. यश रमेश अंधारे (वय १८, रा. थेरगाव, मूळ रा. भोनजे ता. बार्शी, सोलापूर), रितेश मुकेश चव्हाण (वय १८, रा. जगताप नगर, थेरगाव), रुपेंद्र रुपबसंत बैद (वय १९, रा. सुभाष नगर झोपडपट्टी, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, पिंपरी) आणि अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सहायक निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २) रात्री ९.५० वाजताच्या सुमारास आशिष अरजनभा बुवा हे केशवनगर, चिंचवड येथील श्रीजी सिरॅमिक्स दुकानाजवळ थांबले होते. त्यावेळी चार चोरट्यांनी अचानक हल्ला चढवला. हातातील धारदार कोयत्याचे वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील तीन लाख ८० हजार रोकड हिसकावून दहशत निर्माण करत आरोपी पसार झाले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी विशेष पथके तयार केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटली. हे सर्व आरोपी थेरगाव स्मशानभूमीजवळ सापळा रचून पकडण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक समीर लोंढे, प्रविणकुमार तापकीर, अंमलदार ठोकळ, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, गणेश मेदगे, गंगाराम भाग, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयुर दळवी, विजय तेलेवार, शाम बाबा, राजकारण गंगे, रामदास मोहिते, विजय पुढेपुरे, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख यांच्या पथकाने केली.