PMC News : महापालिकेकडून आचारसंहितेचा भंग? महापालिकेत वार्तांकनास पत्रकारांना मनाई
PMC News : पत्रकार असतील तर आम्हाला बोलता येत नाही; लोकप्रतिनिधींच्या संकोचामुळे महापौरांनी पत्रकारांना गेटबाहेर रोखल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

PMC News – शहरात पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची आचरसंहिता सुरू आहे. ही आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेतील पदाधिकारी तसेच नगरसेवकांकडून प्रशासनाला कोणतेही आदेश देता येत नाहीत. मात्र, असे असतानाच, महापालिकेकडून नगरसेवकांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना मज्जाव करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा मज्जाव करण्यासाठी महापौरांनी तसेच नगरसेवकांनी आत न येवू देण्याचा आदेश दिला असल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या निधीतून या प्रशिक्षणाचा खर्च आचारसंहितेत केला जावू शकतो का? तसेच आचारसंहितेच्या काळात महापौर तसेच इतर पदाधिकारी आदेश देऊ शकतात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाकडूनच हे प्रशिक्षण आयोजित केले असल्याने सुरुवातीला पत्रकारांना त्याचे वार्तांकन करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना मज्जाव करण्यात आला.
नगरसेवकांना पत्रकारांचा संकोच
या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना आत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. यावेळी काही पत्रकारांनी महापालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधिनीच्या प्रमुख वसुंधरा बारवे यांना विचारणा केली असताना त्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे बोट दाखवित साहेंबाचे आदेश असल्याचे सांगितले. तर, पत्रकार आल्याची माहिती मिळल्यानंतर नगरसेवकांनी आम्हाला त्यांच्यासमोर प्रश्न विचारायला संकोच वाटतो.
ते असतील तर आम्हाला प्रश्न विचारता येणार नाहीत, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतल्याने महापौरांनी पत्रकारांना आतमध्ये सोडू नये, असे सांगितले असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे, नागरिकांच्या पैशातून हे प्रशिक्षण महापालिका प्रशासनाने आयोजन केले असताना अशा प्रकारे मज्जाव करणे योग्य आहे का, याचे कोणतेही उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.






