Pune Hooch Tragedy : पोलीस-एक्साईजचे निघाले धिंडवडे! बेकायदा दारूचं जाळं नेमकं कोणाच्या आशीर्वादाने?
Pune Hooch Tragedy : मांजरी, फुरसुंगी आणि रामटेकडी परिसरात हातभट्टी आणि स्पिरिट विक्रीचे मोठे जाळे; हडपसर भागातील स्थानिक नागरिक संतप्त.

Pune Hooch Tragedy – फुगेवाडी- हडपसर-काळेपडळमध्ये निष्पापांचे बळी घेणाऱ्या बेकायदा विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. मात्र, या निमित्ताने सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होत असून, तो म्हणजे हे सर्व सुरू असताना पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग करत काय होते? या घटनेच्या निमित्ताने पोलीस-एक्साईज विभागाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
कागदी कारवाई
या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे हा एक्साईज विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे. २०२३, २०२४ आणि २०२५ या सलग तीन वर्षांत रसायनयुक्त दारू प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. असे असतानाही तो खुलेआम विषारी दारूचा व्यवसाय करत होता. त्याच्यावरील कारवाई केवळ कागदावरच झाली का?, तो वर्षानुवर्षे मोकाट कसा फिरत होता?, अवैध धंद्यांना संरक्षण कोणाचे होते?, निष्पाप मृत्यूंसाठी जबाबदार आरोपी आहे की निष्क्रिय यंत्रणा? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. आता योगेश एक्साईज विभागासमोर शरण आला असून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दारु विक्रीचे जाळे
हडपसर, काळेपडळ, मांजरी, फुरसुंगी आणि रामटेकडी परिसरात बेकायदा दारू, रसायनयुक्त हातभट्टी आणि स्पिरिट विक्रीचं मोठं जाळे अनेक वर्षांपासून सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे अड्डे, खुलेआम विक्री आणि स्थानिकांच्या तक्रारी असूनही कारवाई नावालाच झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केले असले तरी नागरिकांचा संताप कमी झालेला नाही. वेळीच कठोर कारवाई झाली असती तर निष्पाप जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
खुलेआम विक्री
बळी गेलेल्या भागात स्पिरिट मिसळलेली गावठी दारू खुलेआम विकली जात असल्याचा आरोप नागरिक करतात. पोलीस आणि एक्साईज अधिकाऱ्यांना याची माहिती होती, तरीही कठोर कारवाई केली नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही दारू अड्डे सुरूच राहिल्याचे नागरिक सांगतात. विशेष म्हणजे सुरुवातीला फुगेवाडीतील मृत्यू हृदयविकार किंवा अन्य कारणांने झाल्याचे सांगण्यात आले. नंतर सर्व मृत्यू रसायनयुक्त दारूमुळे झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.






