मळवली – महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला वेहरगाव येथील आई एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाला गुरवारी सुरुवात झाली आहे. तब्बल दीड वर्षानंतर देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्याने नवरात्रोत्सव काळात एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाकडून कार्ला गडावर व परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारी घटस्थापनेच्या पहिल्याच माळेला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कार्ला गडावर प्रत्यक्ष भेट देत बंदोबस्ताचा व सुरक्षिततेचा आढावा घेतला. शासनाच्या आदेशानुसार मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाली असली तरी दर्शनासाठी काही नियमावली घालून देण्यात आली आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना या वेळी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिल्या आहेत.
गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक असून, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. दर्शनरांगेत उभे राहताना या नियमांचे पालन करावे. कार्ला फाटा ते एकवीरा गड पायथा दरम्यान पोलिसांनी काही जागा निश्चित करून त्याठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे.
याठिकाणीच वाहने उभी करावीत. रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा होईल, अशी वाहने लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच सर्व भाविकांनी रांगेमध्येच दर्शन घ्यावे, हार, फुल विक्रेते व दुकानदार यांनी चेहऱ्यावर मास्क न लावल्यास कारवाई केली जाणार असल्याचे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी सांगितले. लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्ला गडावर दर्शन काळात महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणे, पाकीटमारी, चोरी अशा घटनांवर साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर असणार आहे. गड पायथा ते मंदिर या सर्व परिसरात वॉकी टॉकी उपलब्ध असून तात्काळ संदेश व कारवाईसाठी ते उपयुक्त ठरणार आहे.
नागरिकांच्या तक्रारी व समस्यांसाठी पायथ्याला तात्पुरती चौकी उभारण्यात आली असून, 24 तास याठिकाणी पोलीस उपलब्ध असणार आहेत. करोना नियमांचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नवरात्रोत्सवात असा असेल पोलीस बंदोबस्त
एकवीरा देवी मंदिर बंदोबस्तासाठी 1 डठझऋ प्लाटून, 1 दंगल नियंत्रण पथक, 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 1 डीवायएसपी, 2 पोलीस निरीक्षक, 10 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 100 पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र, वॉर्डन असा ताफा तैनात करण्यात आला आहे.