IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध कुलदीपचा दबदबा! पाचव्यांदा ‘हा’ पराक्रम करत वॉर्डलच्या विक्रमाशी केली बरोबरी

Kuldeep Yadav Set Record against West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात कुलदीपने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात २६.५ षटकांत ८२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या मनगटी फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याचा इंग्लंडच्या माजी फिरकीपटू जॉनी वॉर्डल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
विशेष म्हणजे, कुलदीपने केवळ १५ कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली, तर वॉर्डल यांना यासाठी २८ सामने खेळावे लागले. जॉनी वॉर्डल यांनी १९५७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबन येथे २०.२ षटकांत ६१ धावांत ५ विकेट्स घेऊन आपला पाचव्यांदा पाच विकेट्सचा विक्रम पूर्ण केला होता. कुलदीपने हा विक्रम कमी सामन्यांत गाठला, ज्यामुळे त्याची ही कामगिरी आणखी खास ठरते.
5⃣-fer x 5⃣ times
Kuldeep Yadav gets his fifth five-wicket haul in Tests! 👏
A wonderful performance from him yet again 🔝
Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @imkuldeep18 pic.twitter.com/BUhPgnIVt6
— BCCI (@BCCI) October 12, 2025
डावखुऱ्या मनगटी फिरकीपटूंचा विक्रम:
- कुलदीप यादव: १५ कसोटी, ५ वेळा पाच विकेट्स
- जॉनी वॉर्डल: २८ कसोटी, ५ वेळा पाच विकेट्स
- पॉल अॅडम्स: ४५ कसोटी, ४ वेळा पाच विकेट्स
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात ओढले –
कुलदीपने शनिवारी संध्याकाळी एलिक एथानजे याला बाद करत आपला पहिली विकेट्स घेतली. तिसऱ्या दिवशी सकाळी त्याने शाई होप याला बाद करत दुसरी विकेट्स मिळवली. यानंतर टेविन इमलाच, जस्टिन ग्रीव्हज आणि जेडन सील्स यांना बाद करत त्याने आपला पाच विकेट्स पूर्ण केले. यासह त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. वेस्ट इंडिजविरुद्ध कुलदीप यादवचा दबदबा पाहिला मिळाला आहे. त्याने आपल्या नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्व तिन्ही फॉरमॅटमध्ये ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
- कसोटी: ४ सामन्यांत १९ विकेट्स (स्ट्राइक रेट: ३३.८)
- एकदिवसीय: १९ सामन्यांत ३३ विकेट्स (स्ट्राइक रेट: २७.३)
- टी-२०: ९ सामन्यांत १७ विकेट्स (स्ट्राइक रेट: १२.७)
कुलदीपच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड मिळवली आहे. त्याच्या या यशामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.





