KL Rahul Century : केएल राहुलचे राजकोटमध्ये ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच खेळाडू

KL Rahul Century in Rajkot : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी संकटात असताना अनुभवी फलंदाज केएल राहुल धावून आला. मधल्या फळीतील फलंदाज एकामागून एक बाद होत असताना, राहुलने एक बाजू लावून धरली. यासह त्याने अवघ्या ८७ चेंडूत शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीसह राहुलने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
राजकोटच्या मैदानात रचला इतिहास –
केएल राहुल राजकोटच्या ‘निरंजन शाह स्टेडियम’वर एकदिवसीय शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी एकाही भारतीय फलंदाजाला या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन अंकी धावसंख्या गाठता आली नव्हती. राहुलने ११२ धावांची नाबाद खेळी करत हा दुष्काळ संपवला.
अझरुद्दीनला टाकले मागे –
Calm and Composed Centurion 💯
When the going gets tough, the tough gets going 😎
Scorecard ▶️ https://t.co/x1fEenI0xl#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @klrahul pic.twitter.com/vBEcwq73fb
— BCCI (@BCCI) January 14, 2026
या ८ व्या एकदिवसीय शतकासह राहुलने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला आहे. मोहम्मद अझरुद्दीनने ३३४ सामन्यांत ७ शतके झळकावली होती. आता केएल राहुलने अवघ्या ९३ सामन्यांत ८ शतके झळकावता अझरुद्दीनला मागे टाकले आहे.
२ वर्षांनंतर संपवला शतकाचा ‘दुष्काळ’ –
नोव्हेंबर २०२३ मध्ये बंगळुरू येथे नेदरलँड्सविरुद्ध शतक झळकावल्यानंतर राहुलच्या बॅटमधून एकही शतक आले नव्हते. तब्बल दोन वर्षांनंतर त्याने पुन्हा एकदा शतकी खेळी करत आपण फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे, गेल्या ४ वनडे डावांपैकी ही त्याची तिसरी ५० प्लस धावसंख्या आहे आणि त्यातील तीन वेळा तो नाबाद राहिला आहे.
लेकीसाठी खास ‘सेलिब्रेशन’ –
केएल राहुलने शतक पूर्ण केल्यानंतर अत्यंत वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा केला. त्याने तोंडात बोट धरून केलेल्या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या वर्षी केएल राहुल बाबा झाला असून, हे सेलिब्रेशन त्याने आपल्या मुलीला समर्पित केल्याचे बोलले जात आहे. राहुलने ९२ चेंडूचा सामना ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११२ धावांची नाबाद खेळी साकारली. ज्यामुळे भारतीय संघाला २५० धावांचा टप्पा पार करता आला. भारताने ७ गडी बाद २८४ धावा केल्या असून न्यूझीलंडसमोमर २८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.





