IND vs SA : प्लेइंग इलेव्हनचा सस्पेन्स संपला! ऋषभ-ऋतुराजला मिळणार का संधी? केएल राहुलने केलं स्पष्ट

केएल राहुलची फलंदाजीची जागा निश्चित –
रांची येथे रविवार, ३० नोव्हेंबरपासून मालिका सुरू होत असताना, राहुलने पहिल्या सामन्यापूर्वी प्लेइंग-११ आणि फलंदाजीच्या क्रमाबद्दल काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. पहिल्या वनडे सामन्याच्या एक दिवस आधी (शनिवार, २९ नोव्हेंबर) कर्णधार म्हणून केएल राहुल पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी त्याने प्लेइंग इलेव्हन संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान, राहुलने जाहीर केले की तो या संपूर्ण मालिकेत फलंदाजीच्या मधल्या फळीत खेळेल. केएल राहुल म्हणाला, “मी या मालिकेत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेन.”
ऋषभ पंत फक्त विकेटकीपर म्हणून खेळणार –
ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांच्या संधीबद्दलही राहुलला प्रश्न विचारण्यात आला. पंत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघात परतला आहे, तर गायकवाड जवळपास दोन वर्षांनंतर वनडे फॉर्मेटमध्ये पुनरागमन करत आहे. पंतबद्दल बोलताना केएल राहुलने सांगितले की, पंतमध्ये केवळ फलंदाज म्हणून खेळण्याची क्षमता आहे, पण जर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, तर तो यष्टिरक्षक म्हणून खेळेल.
केएल राहुल म्हणाला, “प्रत्येकाने पाहिले आहे की पंत संघात कोणती गुणवत्ता आणतो. तो केवळ फलंदाज म्हणून खेळण्याची क्षमता ठेवतो, पण जर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल, तर तोच यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळेल.”
ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार –
ऋतुराज गायकवाडला संधी देण्याबद्दल विचारले असता, केएल राहुलने रांची वनडेमध्ये तो खेळेल की नाही हे स्पष्ट केले नाही, पण त्याला मालिकेत संधी मिळेल, अशी ग्वाही दिली. केएल राहुल म्हणाला, “ऋतुराज गायकवाड एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याला जे काही थोडेफार संधी मिळाल्या आहेत, त्यात त्याने दमदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे या मालिकेत त्याला नक्कीच संधी दिली जाईल.”





