मुंबई – आपल्या रोमान्स आणि ऍक्शन ने फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या शाहरुख खानची कीर्ती संपूर्ण जग गातो आहे. टाईम 100 मध्ये वाचकांनी केलेल्या मतदानाच्या आधारे जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्वांची यादी तयार केली जाते. याच 2023 च्या टाइम 100 या वाचकांच्या पोलमध्ये अभिनेता शाहरूख खान याने बाजी मारली आहे.
यामध्ये शाहरूख खानला सर्वाधिक मते मिळाली आहेत. पहिल्या क्रमांकासाठीच्या स्पर्धेत जगभरातील अनेक मोठी नावे होती.ज्यामध्ये ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री मिशेल योह,टेनिसपटू सेरेना विल्यम्स, मार्ख झुकेरबर्ग या नावांचाही समावेश होता. या सगळ्यांना मागे टाकत शाहरूखने हा मान पटकावला आहे.
या यादीमध्ये दुसरे स्थान इराणच्या महसा अमिनीला मिळाले आहे. महसा अमिनी ही 22 वर्षांची तरुणी होती जिने इस्लामी राजवटीखाली असलेल्या या देशात व्यापक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा सुरू केला होता. डोक्यावरील स्कार्फ ढिला बांधल्याचा आरोप करत संस्कृती रक्षकांनी महसाचा बळी घेतला.होता. या यादीत तिसरे आणि चौथे स्थान हे इंग्लंडचा राजपुत्र हॅरी आणि त्याची बायको मेघन यांना मिळाले आहे. पाचवे स्थान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पटकावले आहे.
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचे चाहते जगभर पसरलेले असून त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरूख खान याने आयपीएलचा एक संघही विकत घेतला असून तो कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा मालक आहे. शाहरूख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पठाण चित्रपटाची गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये केली जाते.