Khed Rain: खेड तालुक्यात हाहाकार! दोन तरुण पुरात वाहून गेले; पुणे-नाशिक महामार्ग ५ ते ७ फूट पाण्याखाली
Khed Rain: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाकी येथे पाण्याचा वेढा; ओढे-नाल्यांवरील बेकायदेशीर बांधकामांमुळे परिस्थिती गंभीर झाल्याचा स्थानिकांचा आरोप.

Khed Rain – खेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसांच्या पाण्यात रेटवडी (ता. खेड) येथे ओढ्याला आलेल्या पुरात ३० वर्षीय तरुण समीर भिमाजी जाधव (रा. खालची ठाकरवाडी, रेटवडी) तर शेलू (ता. खेड) येथील ओढ्याला आलेल्या पुरात चाकण एमआयडीसीमध्ये काम करून घरी परतणाऱ्या अमोल विलास डांगले (वय-२२, रा-कडूस) हा वाहून गेल्याची दुदैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे.
तालुक्यात सलग ६० ते ७० तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या धक्कादायक घटना सोमवारी घडल्या. शेलू आणि रेटवडी येथे घडलेल्या या दुर्घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. कडूस येथील डांगले शिवार परिसरात राहणारे अमोल विलास डांगले हे चाकण एमआयडीसीतील एका कंपनीत काम करून रात्रीची शिफ्ट संपवून दुचाकीवरून घरी परतत होते.
शेलू स्मशानभूमीजवळील ओढा ओलांडत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने त्यांना दुचाकीसह वाहून नेले. हा प्रवाह पुढे भामा नदीला मिळत असल्याने आणि नदीला मोठा पूर आल्यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यांची दुचाकी बंधाऱ्याजवळ अडकलेल्या अवस्थेत मिळाली असून अमोल डांगले यांचा शोध सुरू आहे. दुसरी घटना रेटवडी गावात घडली.

चाकण : येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे या मार्गावर अडकलेली प्रवासी बस तसेच प्रवासी.
ओढ्यावरील पुलावरून जात असताना समीर जाधव हा तरुण सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुकानातून साहित्य आणण्यासाठी गेला असता ओढ्याच्या पुरात वाहून गेला. या ठिकाणीही संबंधित तरुणाची दुचाकी पुलाच्या कठड्याला अडकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. एनडीआरएफ जवान, महसूल, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली आहे.
अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही. दुसरीकडे, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाकी परिसरात पावसाच्या पाण्याने रस्त्याने नदीचे स्वरूप धारण केले. महामार्गावर तब्बल पाच ते सात फूट पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. चाकण एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे कामगार, पुणे-नाशिक मार्गावरील प्रवासी तसेच अवजड वाहने अनेक तास महामार्गावर अडकून पडली.
त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि नागरिकांचे प्रचंड हाल झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाकी परिसरातील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बांधकामांमुळे बुजविण्यात आले आहेत. ओढे-नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकामे उभारण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी पाणी थेट महामार्गावर साचून गंभीर परिस्थिती निर्माण झाली. चाकण व वाकी परिसरात अनेक ठिकाणी पाण्याने नदीचे स्वरूप धारण केले असून याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.





