Pune Traffic: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी क्रेडाई पुढाकार! ३ महिन्यांसाठी पोलिसांना मिळणार अतिरिक्त मनुष्यबळ
Pune Traffic: क्रेडाई पुणे आणि शहर वाहतूक पोलीस यांच्यात सामंजस्य करार; बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून सामाजिक बांधिलकीतून मनुष्यबळ उपलब्ध.

Pune Traffic – शहरातील वाढती वाहतूक कोंडी, आगामी पालखी सोहळा, तसेच वाहतुकीचा अतिरिक्त ताण लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीला क्रेडाई पुणेचे १०० ट्रॅफिक वॉर्डन धावून आले आहेत. सुरळीत वाहतुकीसाठी क्रेडाई पुणे या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने सामाजिक बांधिलकीतून तीन महिन्यांसाठी हे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. पुणे पोलीस आणि क्रेडाईमध्ये याबाबत नुकताच सामंजस्य करार झाला आहे.
करारांतर्गत नियुक्त केलेल्या ट्रॅफिक वॉर्डनना शुक्रवारी (दि. ३) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वॉर्डननी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून वाहतूक विभागाला सहकार्य केल्याबद्दल क्रेडाई पुणे संस्थेचे त्यांनी कौतुक केले.
पुण्यात संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, तसेच गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे अतिरिक्त १०० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती ही महत्त्वाची ठरणार आहे. हा उपक्रम पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन, संयोजक संजय देशपांडे आणि प्रशासक कर्नल राम यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात आला. नवे वॉर्डन वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाचे चौक, गर्दीची ठिकाणे, पालखी मार्ग आणि गणेशोत्सवातील प्रमुख मार्गांवर कार्यरत राहतील. वाहतूक सुरळीत ठेवणे, वाहनचालकांना मार्गदर्शन करणे, कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांना सहाय्य करणे आणि वाहतुकीचे नियोजन प्रभावीपणे राबविणे, अशी त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.





