Power Cut: अतिवृष्टीचा फटका! भोसरी २४ तासांपासून अंधारात; सुरक्षेसाठी शेकडो रोहित्रांचा वीजपुरवठा बंद
Power Cut: मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर विभागात ५६९ रोहित्र बंद; आंबेठाण आणि देहूगाव परिसरात पाणी साचल्याने प्रशासनाचा निर्णय.

Power Cut – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वीज वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महावितरणने अनेक ठिकाणी वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवला असून, त्यामुळे हजारो ग्राहकांना वीजविना राहावे लागत आहे. विशेषतः भोसरी परिसरात शनिवार (५ जुलै) सकाळी ११ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित असून, तब्बल २४ तास उलटूनही अनेक भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही.
त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग, इंटरनेट आणि दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला आहे. राजगुरुनगर विभागात सुरक्षेच्या कारणास्तव एकूण ५६९ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. चाकण शहरातील दोन फिडर बंद असल्यामुळे ३३९ रोहित्रे बंद आहेत. याशिवाय राजगुरुनगर उपविभागातील ५, चाकण एमआयडीसीमधील १०१, वडगाव मावळमधील ३९, लोणावळ्यातील ६८ आणि तळेगावमधील १८ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.
आंबेठाण गावाजवळील इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या विनंतीनुसार ३३ केव्ही ह्युंडाई, ३३ केव्ही कॉर्निंग आणि २२ केव्ही आंबेठाण फिडर सकाळी ११.४० वाजल्यापासून काही काळ बंद ठेवण्यात आले. भोसरी विभागात देहूगाव परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार २२ केव्ही देहूगाव फिडर बंद ठेवण्यात आला आहे. तसेच एफए स्विचिंग स्टेशन,
सेक्टर-२४ स्विचिंग आणि ईडब्ल्यूएस स्विचिंग स्टेशनमध्ये पाणी शिरून यंत्रणेला धोका निर्माण झाल्याने या केंद्रांतून होणारा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. नगररोड विभागातील विश्रांतवाडी शाखेच्या इंदिरानगर भागात पाणी शिरल्यामुळे एक रोहित्र बंद करण्यात आले आहे. तसेच शांतीनगर आणि चव्हाण चाळ परिसरात पुराचे पाणी घुसल्याने तेथील तीन रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.
पिंपरी विभागातही अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. २२ केव्ही म्हाडा फिडरचा आरएमयू पाण्यात गेल्याने घनश्याम स्विचिंगचा वीजपुरवठा ठप्प झाला. भोंडवे कॉर्नर येथे पाणी साचल्यामुळे बीए आणि अक्षरलँड फिडरच्या आरएमयूमध्येही पाणी शिरले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेद्वारे पुनावळे आणि तथावडे फिडरवरून वीजपुरवठा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच एम्पायर सोसायटीच्या पॅनल रूममध्ये पाणी शिरल्याने एम्पायर फेज-१ फिडर हँड ट्रिप करून बंद ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, भोसरी परिसरात ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित असून, २४ तासांहून अधिक काळ उलटूनही काही ठिकाणी वीज आलेली नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महावितरणकडून पाणी ओसरल्यानंतर सुरक्षिततेची खातरजमा करून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.






