Khadki Railway Station: खडकी रेल्वे स्टेशनचा कायापालट! पहिल्या टप्प्यातील हाय-टेक कामे पूर्ण; पाहा नवे रूप
Khadki Railway Station: प्लॅटफॉर्म ३ आणि ४ ची उंची वाढवून हाय-लेव्हलमध्ये रूपांतर; ट्रेन आणि डब्यांची अचूक जागा दर्शवणारे अत्याधुनिक डिजिटल बोर्ड कार्यान्वित.

Khadki Railway Station – रेल्वे विभागातील महत्त्वाचे असलेले खडकी रेल्वे स्थानक आता नव्या रूपात येत आहे. प्रवास सुरक्षित, आधुनिक आणि सुटसुटीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी व्यापक विकासकामे हाती घेतली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, स्थानक नव्या आधुनिक रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
या विकासकामामांमुळे खडकी, रेंजहिल्स, लष्करी क्षेत्र आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ ची उंची वाढवून त्यांचे रूपांतर हाय-लेव्हल प्लॅटफॉर्ममध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांना लोकल किंवा एक्सप्रेस गाड्यांमध्ये चढताना-उतरताना होणारा त्रास वाचणार आहे. पावसाळा आणि कडक उन्हाचा त्रास प्रवाशांना होऊ नये,
यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वर प्रत्येकी ३०० मीटर लांबीचे मजबूत कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म (शेड) उभारण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या दिशेने नवीन प्रवेश गेट तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे प्रवाशांना थेट ये-जा करणे सोपे होईल. गाड्यांच्या माहितीसाठी प्लॅटफॉर्मवर अत्याधुनिक ट्रेन इंडिकेटर बोर्ड आणि डब्यांची अचूक जागा दर्शवणारे डिजिटल कोच इंडिकेटर बोर्ड बसवण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील कामे प्रगतिपथावर…
दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकासाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वेच्या प्रशासकीय कामकाजासाठी येथे एक भव्य एलिव्हेटेड ऑफिस बिल्डिंग (मुख्य कार्यालयीन इमारत) उभारली जात आहे, ज्यामुळे सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील. स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी सहा मीटर रुंदीचा प्रशस्त पादचारी पूल बांधण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म बदलताना वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांचा त्रास वाचवण्यासाठी अत्याधुनिक लिफ्ट आणि सरकते जिने बसवले जात आहेत. हा प्रकल्प जागतिक दर्जाचे बनवून प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व आरामदायक होईल.
“खडकी रेल्वे स्थानक परिसरात शैक्षणिक संस्थांचे जाळे असल्याने येथे दररोज प्रवाशांची मोठी गर्दी असते. नवीन प्लॅटफॉर्म, शेड्स आणि डिजिटल इंडिकेटर कार्यान्वित झाल्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे. आगामी काळात लिफ्ट आणि पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे स्थानक पुणे विभागातील प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून नावारूपास येईल.”
– हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग






