Ashwini Vaishnaw: आळंदीत उभारणार ९ प्लॅटफॉर्मचे ‘मेगा कोचिंग टर्मिनल’; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
Ashwini Vaishnaw: पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल ऑपरेशन कंट्रोल सिस्टीम; प्लॅटफॉर्मची संख्या ६ वरून १२ होणार.

Ashwini Vaishnaw – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, आळंदीत ९ प्लॅटफॉर्मचे मेगा कोचिंग टर्मिनल उभे राहणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. पुणे आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला आहे. पुणे रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म संख्या ६ वरून १२ होणार असून, तिसरे नवीन प्रवेशद्वार उभारले जाईल.
अत्याधुनिक डिजिटल ऑपरेशन कंट्रोल सिस्टीमसह होणाऱ्या या विस्तारीकरणामुळे पुण्यातून नव्याने २० अतिरिक्त गाड्या सुरू करणे शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले. पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस आणि हडपसर स्थानकावरून पुणे-दानापूर अमृत भारत एक्सप्रेस या नवीन गाड्यांना बुधवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखवून रवाना करण्यात आले.
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव आदी उपस्थित होते. पुणे आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने ६०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक आराखडा तयार केला असून, याअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजनही मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री आणि विधापरिषदेचे सभापती राम शिंदे व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
अश्विनी वैष्णव म्हणाले, पुणे विभागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन उरुळी कांचन येथील जमीन हस्तांतरणाच्या अडचणी आणि वाढत्या खर्चामुळे मेगा कोचिंग टर्मिनल प्रकल्प आळंदी येथे हलविण्यात आला आहे. तेथे ९ प्लॅटफॉर्म, ७ पीट लाइन आणि १७ स्टेबलिंग लाइन उभारल्या जाणार आहेत. पुणे-मुंबई मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचे कामही हाती घेण्यात आले आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे सेवा आणि पुणे स्थानकाचा ४७३ कोटींचा पुनर्विकास हा पुण्याच्या विकासाला नवी गती देणारा आहे. लाखो साईभक्तांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाल्यामुळे धार्मिक पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.






