Pimpri Railway Station: पिंपरी रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर पुन्हा सुरू; ‘दैनिक प्रभात’च्या बातमीचा इम्पॅक्ट
Pimpri Railway Station: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा; स्थानिकांकडून 'प्रभात' आणि रेल्वे प्रशासनाचे आभार.

Pimpri Railway Station – दैनिक प्रभातमध्ये “पिंपरी रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर बंदच!” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत स्थानकावरील बंद असलेले एस्केलेटर पुन्हा सुरू केले आहेत. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवाशांनी दैनिक प्रभात आणि रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
जड सामान घेऊन जिने चढ-उतार करताना अनेक प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर दैनिक प्रभातने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्तानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून एस्केलेटर सुरू केले. त्यामुळे स्थानकावरील प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ झाली असून गर्दीच्या वेळेतही मोठा दिलासा मिळत आहे.
स्थानिक प्रवासी आणि नागरिकांनी दैनिक प्रभातने जनहिताचा प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारे नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही होत असल्याने माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. तसेच भविष्यातही रेल्वे स्थानकावरील सर्व सुविधा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.





