ST Bus Stand: चिखली-मोशी परिसरात उभारणार आधुनिक एसटी बस स्थानक; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
ST Bus Stand: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना; पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत प्रकल्पाला मिळाली गती.

ST Bus Stand- पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील चिखली / मोशी येथे आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याच्या मागणीची राज्य शासनाने तातडीने दखल घेतली आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाला या प्रस्तावावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार महेश लांडगे यांनी दि. २५ जून रोजी परिवहन मंत्र्यांना निवेदन सादर करून चिखली / मोशी परिसरातील आरक्षित जागेवर आधुनिक व सुसज्ज एसटी बस स्थानक उभारण्याची मागणी केली होती. विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सकारात्मक निर्णय घेत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.
या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना तातडीने निर्देश देत, कार्यवाही जलदगतीने करण्याचे आदेश दिले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी बस स्थानकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चिखली-मोशी परिसर हा पुणे-नाशिक महामार्गालगत असून, वाकड-हिंजवडी परिसर मुंबई-बंगळुरू महामार्गाशी जोडलेला आहे. त्यामुळे या दोन्ही भागांपैकी योग्य ठिकाणी एसटी बस स्थानक उभारल्यास उत्तर पिंपरी-चिंचवडसह औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रस्ताव पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





