Khadakwasla Dam: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! खडकवासला धरणात गेल्या वर्षापेक्षा ५.६१ टीएमसी कमी
Khadakwasla Dam: खडकवासला साखळी प्रकल्पात सध्या १७.२६ टीएमसी साठा; ६० टक्के साठा उपलब्ध असला तरी गतवर्षीपेक्षा साठा लक्षणीय कमी.

Khadakwasla Dam – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सध्या १७.२६ टीएमसी म्हणजे ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अद्यापही ५.६१ टीएमसी इतका कमी आहे. शहराला आवश्यक असणारे पाणी, उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन आणि शेतीचे आर्वतन या सर्वांचा विचार करून पाणी नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. जून महिन्यात यावर्षी पाऊस पडलाच नाही.
मात्र, जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाने धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. सुमारे आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणामध्ये चांगला पाणीसाठा जमा होऊन सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. खडकवासला प्रकल्पाची एकूण क्षमता सुमारे २९ टीएमसी इतकी आहे. साधारणपणे जुलैच्या महिन्याअखेर पर्यंत किंवा आॉगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही चारही धरणे १०० टक्के भरतात.
मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने धरणातील येवा कमी झाला आहे. खडकवासला प्रकल्पात मागील वर्षी २२.८७ टीएमसी म्हणजे ७९ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हा पाणीसाठा १७.२६ टक्के इतका आहे. खडकवासला धरणात ७० टक्के, पानशेत धरणात ६४ टक्के, वरसगाव धरणात ५८ टक्के आणि टेमघर धरणात ४१.७० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
वारीमुळे कालव्याला पाणी…
खडकवासला धरणातून कालव्याद्वारे एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी वारीसाठी तसेच शेतीसाठी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. आता पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सुरु असलेले आर्वतन बंद करायचे की कमी करायचे याचा निर्णय सोमवारी (दि.२०) होणार आहे.



