Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत १७ टीएमसी पाणीसाठा असताना पाणीकपात कशासाठी?
Khadakwasla Dam : सजग नागरीक मंचाचा महापालिकेला सवाल

पुणे : खडकवासला धरणसाखळीत सुमारे १७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असताना १५ जुलैपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याची गरज काय, असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
हा निर्णय १५ ऑगस्टपर्यंत स्थगित करून त्यानंतर पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सर्व आमदार, महापौर आणि महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांकडे केली आहे. (Khadakwasla Dam)
वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या वरसगाव धरणात ७.१० टीएमसी, पानशेतमध्ये ६.४६ टीएमसी, टेमघरमध्ये १.४६ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.८४ टीएमसी असा एकूण सुमारे १७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या पाच दिवसांतच धरणसाखळीत १३ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. (Khadakwasla Dam)

Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत १७ टीएमसी पाणीसाठा असताना पाणीकपात कशासाठी?
महापालिका दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी खडकवासला धरणसाखळीतून घेत असून उर्वरित पाणी भामा-आसखेड धरणातून मिळते. त्यामुळे सध्याचा साठा पुढील वर्षी जूनपर्यंत पुरेल, असा दावा त्यांनी केला आहे. (Khadakwasla Dam)
अजून अडीच महिन्यांचा पावसाळा शिल्लक असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तरी धरणे पूर्ण भरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणसाखळीची साठवण क्षमता सुमारे २९ टीएमसी असून त्यापेक्षा जास्त पाणी नदीपात्रात सोडावे लागते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण भरल्याने दीड टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले होते.
अशा परिस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा त्रास होणार असून टँकर व्यवसायाला मात्र त्याचा फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्तांना निर्देश देऊन १५ ऑगस्टपर्यंत पाणीकपात रद्द करावी आणि त्यानंतर पावसाच्या परिस्थितीनुसार आवश्यक असल्यास निर्णय घ्यावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.





