Dimbhe Dam: डिंभे धरणात ५२ टक्के पाणीसाठा! गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीपातळी तब्बल ६ मीटरने घटली
Dimbhe Dam: आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात सध्या १८३.६९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा; गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात २३.४९ टक्क्यांची मोठी घट.

Dimbhe Dam – आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरणातील पाणीसाठा शनिवारी (दि. 18) सकाळी 6 वाजेपर्यंत 52 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणाची पाणीपातळी सुमारे 6 मीटरने कमी असल्याने यंदाच्या पावसाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, धरणाची सध्याची पाणीपातळी 707.74 मीटर असून एकूण 212.01 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 183.69 दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या धरणातून कालवे, नदी किंवा जलविद्युत केंद्रासाठी कोणताही विसर्ग सुरू नसून सांडवाही बंद आहे. गेल्या 24 तासांत धरण परिसरात केवळ 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चालू पावसाळ्यात आतापर्यंत 596 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणाची पाणीपातळी 713.73 मीटर होती आणि धरण 75.42 टक्के भरले होते.
त्यावेळी हंगामातील एकूण पाऊस 1,359 मिलिमीटर झाला होता. त्यामुळे यंदा पाणीपातळीत 5.99 मीटर, तर पाणीसाठ्यात 23.49 टक्क्यांची घट झाली आहे. याशिवाय पावसातही 763 मिलिमीटरची तूट नोंदवली गेली आहे. डिंभे धरणावरून आंबेगाव, जुन्नर, पारनेर, शिरूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांना सिंचन व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही, तर ऑगस्टमध्ये पाणी वापराबाबत निर्बंध घालण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता जलसंपदा विभागातील अधिकार्यांनी व्यक्त केली.





