Khadakwasla Dam: पुणेकरांना मोठा दिलासा! खडकवासला धरणसाखळी १००% फुल; पाहा किती टीएमसी साठा जमा
Khadakwasla Dam: पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणेकरांची आगामी वर्षातील पाण्याची चिंता मिटली.

Khadakwasla Dam – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा गतवर्षीच्या तुलनेत ३.२९ टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे १०० टक्के भरली असून, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता चारही धरणांमध्ये मिळून २९.१५ टीएमसी पाणीसाठा नोंदविण्यात आला.
गतवर्षी याच कालावधीत हा साठा २५.८६ टीएमसी म्हणजेच ८८.७७ टक्के होता. पावसाळ्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणसाखळीत सध्या एकूण ३१४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणे तुडुंब भरलेली असतानाही पाण्याची आवक कायम असल्याने अतिरिक्त पाण्याचे नियोजन करावे लागत आहे.
खडकवासला धरणात १.९७ टीएमसी, पानशेतमध्ये १०.६५ टीएमसी, वरसगावमध्ये १२.८२ टीएमसी आणि टेमघरमध्ये ३.७१ टीएमसी पाणीसाठा आहे. खडकवासला धरणातून आतापर्यंत १३.२५ टीएमसी पाणी सांडव्याद्वारे सोडण्यात आले आहे.
शहराच्या पाण्याची चिंता दूर…
पुणे शहराच्या आगामी पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध असलेला अतिरिक्त ३.२९ टीएमसी साठा शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्यास आवक वाढण्याची शक्यता असल्याने धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्गाचे नियोजन सुरू असून दुसरीकडे पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मागील १५ दिवसांपासून मुठा नदीत अविरत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.




