Khadakwasla Dam: धरण क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ! खडकवासला धरणातून यंदाचा सर्वाधिक विसर्ग
Khadakwasla Dam: वरसगाव व पानशेत धरणातील वाढत्या पाणीसाठ्यामुळे खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवून ४३ हजार ५७१ क्युसेकवर.

Khadakwasla Dam – खडकवासला, पानशेत, वरसगाव या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभरात जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. आधीच धरणे १०० टक्के भरली असल्याने आणि धरणात जमा होणारे पाणी याचा विचार करून पानशेत, वरसगाव या धरणातून विसर्ग वाढविण्यात आला.
दोन्ही धरणातून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून दिवसभरात टप्प्याटप्प्याने वाढ करत सायंकाळी पाच वाजता धरणातून मुठा नदीत तब्बल ४३ हजार ५७१ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेला हा विसर्ग यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विसर्ग असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. दिवसभरच पावसाचा जोर कायम होता. पानशेत धरणात दिवसभरात १२१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर वरसगाव आणि टेमघर धरणात दिवसभरात १०९ मिमी पाऊस पडला आहे. तर खडकवासला धरणात ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
दिवसभरात चांगला पाऊस पडल्याने धरण परिसरातील ओढे-नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे वरसगाव, पानशेत धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. वरसगाव, पानशेत धरणातून येणारे पाणी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी यामुळे खडकवासला धरणातील विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. सकाळी ५ हजार ७८३ क्युसेकने सोडण्यात येत असलेल्या विसर्गामध्ये वाढ करत हा विसर्ग ४३ हजार ५७१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




